• Thu. Apr 15th, 2021

रोहित आणि विराट :

स्टार सलामीवीर रोहित शर्मा याच्या जखमेसंदर्भात संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवडकर्ते यांच्यात असलेली संवादहीनता दुर्दैवी असल्याचे मत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. मुख्य कोच रवी शास्त्री यांनी तरी कर्णधार विराट कोहलीला जखमेसंर्भात कळवायला हवे होते, असे मत मांडून गंभीरने कोचवर नेम साधला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका सुरु होण्याआधी विराटने रोहितच्या जखमेसंदर्भात सुरू असलेल्या वावड्यांवर नाराजी व्यक्त करताना, अद्याप कुठलेही चित्र स्पष्ट नाही तसेच संवादहीनतेमुळे संघ व्यवस्थापन रोहितच्या उपलब्धतेबाबत वेट ॲन्ड वॉचशिवाय काहीही करू शकत नाही, असे म्हटले होते.

‘या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी आपापली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी होती. कर्णधार म्हणतो या संदर्भात त्याला माहिती नाही. याबाबतीत सर्वांत महत्त्वाचे तीन व्यक्ती होते. त्यात फिजिओ, मुख्य कोच आणि निवड समिती अध्यक्षांचा समावेश आहे. या तिन्ही लोकांमध्ये एकमत असायला हवे होते, असे गंभीरने स्टार स्पोर्ट्‌सच्या कार्यक्रमात सांगितले.

मुख्य कोचने रोहितच्या संदर्भात विराटला स्पष्ट माहिती द्यायला हवी होती. रोहित हा फलंदाजीचा आधारस्तंभ आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची गरज होती. तुम्ही पत्रकारांपुढे जाता आणि बोलता की रोहितच्या जखमेबाबत कुठलीही ठोस माहिती नाही, हा प्रकार दुर्दैवी आहे. महत्त्वाच्या खेळाडूंविषयी इतकी संवादहीनता आणि आणि समन्वयाचा अभाव योग्य नाही. या गोष्टींची उणीव केवळ कोचच्या भूमिकेमुळे झाली, असे मत गंभीरने मांडले.

माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही गंभीरच्या सुरात सूर मिळवला. लक्ष्मण म्हणाला, ‘रोहित संघात असायला हवा होता. संवाद नसल्यामुळे मी निराश झालो. व्हाॅट्‌सअपच्या युगात इतकी खराब स्थिती पाहून मी आश्चर्यचकित आहे. संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि बोर्डाच्या वैद्यकीय पथकादरम्यान निश्चितपणे व्हाॅट्‌सॲप ग्रूप असायला हवा. सर्वसाधारणपणे जे काही घडते त्याची सर्व माहिती संघ व्यवस्थापनाला कळविली जाते.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Hello,
Can we Help You ☺️