• Thu. Apr 15th, 2021

पीएम मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात उदयनराजे भोसलेंची वर्णी लागणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार डिसेंबरअखेरीस होण्याची चिन्हे असून नव्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारला शह देण्यासाठी भाजप उदयनराजेंच्या रूपाने मराठा कार्ड वापरणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात विराजमान झाले. त्याला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आहे. यापूर्वीही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दीड वर्षांचा कालावधी पूर्ण करताच पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला होता. त्यामुळे डिसेंबरअखेरीस या खेपेलाही पहिला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. त्यातच मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रामविलास पासवान व सुरेश अंगडी या केंद्रीय मंत्र्यांचे निधन झाले.
त्यामुळे दोन जागा रिक्त झाल्या. त्याचा अतिरिक्त भार अन्य मंत्र्यांवर आहे. याशिवाय शिवसेनेचे अरविंद सावंत व अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यामुळे आणखी दोन जागा रिक्त झाल्या. फेब्रुवारी महिन्यात संसदेचे अधिवेशन असल्याने तत्पूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होणे आवश्यक आहे. त्याद़ृष्टीने भाजपला उपयुक्त ठरणार्‍या नावांची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार जाण्यास सातार्‍याची पावसाची सभा कारणीभूत ठरली. त्यातून महाविकास आघाडी उदयाला आली.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आली. या सरकारला शह देण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. मात्र, त्यात भाजप यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे जिथे महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेबाहेर जाण्याचे बीज पेरले गेले तिथेच ताकद देण्याचा विचार दिल्लीत सुरू झाला आहे.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाने वणवा पेटला आहे. भाजपच्या सत्तेच्या कालावधीत मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रभर रान पेटवले गेले मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतही मराठा आरक्षणाचा विषय सुटलेला नाही. भाजपने या मुद्यावरून रान तापवायला सुरूवात केली असली तरी छत्रपती उदयनराजे वगळता भाजपकडे दुसरा आक्रमक चेहरा नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे निमित्त साधत भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या खा. उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करून आम्ही मराठ्यांच्या विरोधात नाही उलट छत्रपतींच्या गादीचा आम्हीच सन्मान करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करु शकतो.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रक्रियेत छत्रपती उदयनराजेंच्या नावासाठी कमालीचे आग्रही असल्याची चर्चा आहे. उदयनराजेंना केंद्रात मंत्रिपद दिले तर महाराष्ट्रभर भाजपला त्याचा फायदा होईल, अशी अटकळ भाजपच्या राज्यातील वर्तुळात बांधली जात आहे. त्यातूनच उदयनराजेंचे नाव पुढे आले आहे. सातारा जिल्ह्यातही उदयनराजेंचे समर्थक राजेंना मंत्रिपद मिळणारच असे छातीठोकपणे बोलताना दिसत आहेत.

https://sejalmedianetwork.com/category/trending-news/

https://www.instagram.com/SejalMediaNetwork_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Hello,
Can we Help You ☺️